भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: महावितरण कर्मचाऱ्यांकडून ज्येष्ठ महिलेला मोफत वीज जोडणी!
शिरूरमध्ये महावितरण कार्यालयात जयंती उत्साहात; कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना दिला मदतीचा हात.

शिरूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शिरूर येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) कार्यालयात एका प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत केवळ जयंती साजरी केली नाही, तर सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण देत एका गरजू ज्येष्ठ महिलेला मोफत वीज जोडणी करून दिली.
या कार्यक्रमात महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव आणि सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी कार्यालयातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.
या सोहळ्यादरम्यान, इंदिरानगर येथे राहणाऱ्या शारदा ज्ञानेश्वर मैड या ज्येष्ठ महिलेला नवीन वीज जोडणी प्रदान करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, या वीज जोडणीसाठी येणारा खर्चाची रक्कम कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे भरली. आजच्या पवित्र दिनी एका गरजू महिलेला मदत करण्याचा हा उपक्रम कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने राबविला, ज्यामुळे परिसरात सकारात्मक संदेश गेला आहे.
उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील दुर्बळ घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक छोटासा प्रयत्न करत एका गरजू महिलेला वीज जोडणी देऊन त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला आहे. कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे.”
सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांनी कर्मचाऱ्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आणि सांगितले की, “महावितरण केवळ वीज पुरवठा करण्याचे काम करत नाही, तर सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासाठीही नेहमी तत्पर असते. कर्मचाऱ्यांच्या या योगदानातून इतरांनाही प्रेरणा मिळेल.”
यावेळी उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव, सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांच्यासह महावितरणचे कर्मचारी सुमित अहिरे, राजेंद्र उरमुरे, दादा महाजन, आप्पा लोंढे, अशोक गुळादे, परवेज खान, फिरोज खान आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.