५० लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम शेतकऱ्यांना न देता स्वतःच्या खात्यावर वळवली
न्यायालयाच्या आदेशानंतर शिरूर पोलिसांकडून कारवाई
सविस्तर बातमी
पुणे: शिक्रापूर (शिरूर) – शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील दोन शेतकऱ्यांची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे यांच्यासह १० जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण अजित मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी सासवड आणि अजित नागरी सहकारी पतसंस्था सासवड यांच्याशी संबंधित आहे.
शिक्रापूर (गणेगाव दुमाला) येथील शेतकरी सचिन बाळासाहेब गरुड यांनी यासंदर्भात शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, २०१९ मध्ये सचिन गरुड आणि त्यांच्या दोन मित्रांना त्यांच्या व्यवसायासाठी कर्जाची गरज होती. त्यांनी अजित मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि अजित नागरी पतसंस्था यांच्याकडे कर्जासाठी अर्ज केला. या पतसंस्थांनी त्यांची गणेगाव दुमाला येथील जमीन गहाण ठेवून अनेक कागदपत्रे घेतली.
कागदपत्रे दिल्यानंतर, पतसंस्थांनी ५० लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. मात्र, अनेक वेळा मागणी करूनही “कागदपत्रे अपूर्ण आहेत” असे कारण देत त्यांना कर्जाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. या दरम्यान, पतसंस्थेचे संस्थापक, संचालक, आणि व्यवस्थापक यांनी संगनमत करून मंजूर झालेली ५० लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना न देता स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतली.
२०२३ मध्ये सचिन गरुड यांना अचानक कर्ज थकल्याने जमीन जप्तीची नोटीस मिळाली. हा प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ तहसीलदार कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, ही फसवणूक त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर, त्यांनी शिरूर न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेतली आणि शिरूर पोलिसांना आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
या आदेशानुसार, माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे यांच्यासह दिलीप नारायण वाल्हेकर, बाळासाहेब काळे, अजिंक्य अशोक टेकवडे, दिनेश श्रीकांत घोणे, भूषण सुभाष गायकवाड, सतीश महादेव जाधव, प्रदीप दिगंबर जगताप, आणि गणेश अंकुश जगताप अशा एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.