मोठी बातमी:मनोज जरांगे- पाटील यांची निवडणुकीतून माघार

मित्र पक्षाकडून अद्याप यादी न आल्याने आणि एका जातीवर निवडणूक लढणे शक्य नसल्यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेत आहोत. त्यामुळे आपल्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायची ते आणा, असे आवाहन मराठा आंदोलनेचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी केले आहे.
सोमवारी सकाळी अंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनोज जरंगे-पाटील म्हणाले की,मराठा- मुस्लिम- दलित या शक्तीच्या आधारे आपण निवडणुकीला सामोरे जाणार होतो त्यानुसार, रविवारी आपली मित्रपक्षा सोबत चर्चा झाली होती. आम्ही सायंकाळ पर्यंत आमची उमेदवार कळवतो, असे त्यांनी आपल्याला सांगितले होते. मात्र रविवारी रात्री त्यांच्याकडून उमेदवारी यादी देण्यात आली नाही आणि अजूनही त्यांची यादी आली नाही. त्यामुळे याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आम्ही पहाटे ३ वाजेपर्यंत सगळे सहकारी एकत्रित बसलो.
सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. असे असताना अजून जर मित्र पक्षाची यादी आली नसेल तर आपण अर्ज मागे कधी घेणार ? आणि मित्रपक्ष सोबत नसतील तर फक्त एकदा जातीच्या आधारावर निवडणूक लढवायची का? असा प्रश्न मी सर्वांना विचारला. त्यावर सगळ्यांनी नको असे सांगितले. त्यामुळे आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत आहोत, अशी घोषणा केली
जरांगे पाटील म्हणाले की,समाज बांधवांना आप-आपले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आना ,असे आवाहन जरांगे – पाटील यांनी केले आहे.