
मनोज जरांगे पाटील यांनी दलित- मराठा – मुस्लिम अशी मोट बांधत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी केली होती.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी मित्र पक्षाकडून उमेदवारांची यादी आली नसल्याचे कारण दिले. पण आता आंबेडकरवादी नेते राजरत्न आंबेडकर यांनी त्यांचा दावा खोडून काढला आहे. आम्ही मनोज जरांगे यांना अगोदरच उमेदवाराची यादी दिली होती. पण त्यानंतरही त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो, असे ते म्हणाले.
राजरत्न आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवायची किंवा नाही हा त्यांचा निर्णय होता. आम्ही त्यांना याविषयीचे सर्व अधिकार दिले होते. आम्ही त्यांच्या विरोधात जाणार नाही. पण जरांगे यांनी निवडणूक न लढविण्याचे जे कारण दिले, त्यामुळे मराठा,, बौद्ध व मुस्लिम समाजात संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. ही संभ्रमावस्था दूर करणे ही माझी जबाबदारी आहे. कारण आमच्यासाठी सामाजिक ऐक्य हे महत्त्वाचे आहे.
राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले की, मराठा समाजाच्या मनात कोणताही भ्रम राहू नये, कोणताही द्वेष राहू नये यासाठी मी हे सांगत आहे.
निवडणूक लढवायची की नाही हा निर्णय पूर्णतः मनोज जरांगे यांचा आहे. पण उमेदवाराची यादी न मिळणे हे निवडणूक न लढवण्याचे कारण असू शकत नाही. आता जरांगे यांच्यावर कुणाचा दबाव आहे का? हे मला माहित नाही, असेही राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले.