ताज्या घडामोडी
Trending
वृक्षारोपण कार्यक्रमाचा उत्साह: शिरूरमध्ये ‘हरित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत पोलीस आणि नागरिकांचा सहभाग
निर्भय न्यूज: वृत्तसेवा

शिरूर, दि. ०५/०८/२०२५:
‘हरित महाराष्ट्र घडवूया’ या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशन आणि श्रीविश्वक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज शहरात एका विशेष वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘एक झाड-एक कर्तव्य’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात शिरूर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात पोलीस अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, राजकीय प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा सक्रिय सहभाग दिसून आला.
शिरूर शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. स्वप्निल भालेकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विषद केले. ‘पर्यावरण वाचवा’ या अभियानाला बळ देण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. प्रत्येक सहभागी व्यक्तीला एक झाड दत्तक देण्यात आले असून, त्या झाडाची निगा राखण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली आहे.