मंचर, आंबेगाव, पुणे: समर्थ भारत वृत्तपत्राच्या पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर मंचर तालुका, आंबेगाव येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार संघातर्फे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत, लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी एकजुटीने आवाज उठवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
या निषेध मोर्च्यात आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, श्री. सुनील खिल्लारी यांनी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींवर वाढत्या हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होणारे असे हल्ले अत्यंत निंदनीय आहेत. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचे काम करतात, आणि त्यांच्यावरच असे हल्ले होणे हे लोकशाहीसाठी घातक आहे.”
श्री. खिल्लारी यांनी असे हल्ले पुन्हा होऊ नयेत यासाठी सर्व लोकशाही मानणाऱ्या समाज घटकांनी एकत्र येऊन याविषयी आवाज उठवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. “समाजातील प्रत्येक घटकाने, विशेषतः लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने, या हल्ल्यांविरोधात एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. तरच अशा घटनांना आळा बसेल आणि निर्भयपणे काम करण्याचे वातावरण निर्माण होईल,” असे आवाहन त्यांनी केले.
या निषेध मोर्च्यात मोठ्या संख्येने पत्रकार, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने स्नेहा बारवे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने ठोस पाऊले उचलावीत अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.