शिरूर बसस्थानकातून साडेसहा तोळ्यांचे गंठण आणि झुबे चोरीला!
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

शिरूर: शिरूर बसस्थानकातून अज्ञात चोरट्याने एका महिलेचे साडेसहा तोळे वजनाचे सोन्याचे गंठण आणि १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुबे चोरून नेले. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी सौ. रूपाली अनिल काळेल (वय ४८, व्यवसाय-गृहिणी, रा. त्रिमूर्ती नगर, भिगवणरोड जळोची, बारामती) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सौ. काळेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या त्यांची मुलगी तन्त्री आणि भाची साक्षी यांच्यासोबत ११ मे २०२५ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास बारामती येथे जाण्यासाठी शिरूर बसस्थानकात नायरा केडगाव चौफुला एस.टी. बसमध्ये चढत होत्या. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अंदाजे ४,६८,००० रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण आणि कानातील झुबे (अंदाजे १३ ग्रॅम) चोरून नेले.
या घटनेची तक्रार सौ. काळेल यांनी त्याच दिवशी सायंकाळी ४:३९ वाजता शिरूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जगताप हे करत आहेत. पोलिसांनी बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरु केले असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे बसस्थानकावर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.