शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथे रस्ता कामावरून हाणामारी; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

शिरूर (प्रतिनिधी): शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथे रस्ता बनवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील तीन जणांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी श्री. काशिनाथ दादाभाऊ वागदरे (वय ५०, व्यवसाय शेती, राहणार निमगाव दुडे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मे २०२५ रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास मौजे निमगाव दुडे येथे रस्ता बनवण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान आरोपी खंडू भाऊसाहेब शिंदे, रखमा शिंदे, योगेश उत्तम शिंदे, राहुल उत्तम शिंदे आणि इतर दोन ते तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी काशिनाथ वागदरे, त्यांची पत्नी सुनीता आणि भावजय लिलाबाई यांना हाताने, दगडाने व काठीने मारहाण केली. तसेच आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून दमदाटी देखील केली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेनंतर फिर्यादी काशिनाथ वागदरे यांनी तात्काळ शिरूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी खंडू भाऊसाहेब शिंदे, रखमा शिंदे, योगेश उत्तम शिंदे, राहुल उत्तम शिंदे व इतर दोन ते तीन अनोळखी इसमांविरुद्ध भा.द.वि.च्या कलम BNS 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 191(2), 191(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार बनकर (तपासी अंमलदार) करत आहेत. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.