पिण्याच्या पाण्यासह इतर समस्यांसाठी फुलडाळेंनी पुकारले होते उपोषण, प्रशासनाने दखल घेत दिले आश्वासन
शिरूर बसस्थानकाच्या समस्या दहा दिवसांत सुटणार, प्रशासनाचे लेखी आश्वासन

शिरूर बसस्थानकाला मिळणार लवकरच दहा नवीन बस; पिण्याच्या पाण्यासह इतर समस्या दहा दिवसांत सुटणार
शिरूर (प्रतिनिधी): शिरूर बसस्थानकाला दहा नवीन बस देण्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून पुढील महिन्यात या बस उपलब्ध होतील. यासोबतच बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याची समस्या आणि इतर विविध समस्या दहा दिवसांच्या आत सोडविल्या जातील, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी आपले बेमुदत उपोषण आंदोलन स्थगित केले.
शिरूर बसस्थानकाला नवीन बस मिळाव्यात, तसेच प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी आणि बसस्थानकातील इतर समस्या तातडीने सुटाव्यात, या मागणीसाठी फुलडाळे यांनी शुक्रवार, दि. ११ पासून बसस्थानकावर बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांच्या या आंदोलनाची दखल घेत पुणे जिल्हा विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे, आगार व्यवस्थापक मनीषा गायकवाड, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि स्थानक प्रमुख भैरवनाथ दळवी यांनी आज उपोषणस्थळी भेट देऊन फुलडाळे यांच्याशी चर्चा केली.
या चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी फुलडाळे यांना बस आणि स्थानकातील समस्या सोडवण्याबाबत लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर फुलडाळे यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षिरसागर, भाजपचे संपर्क प्रमुख बाबुराव पाचंगे, प्रवासी संघाचे अनिल बांडे, शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संतोष शिंदे, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रिया बिरादार, भाजपा अल्पसंख्यांक अध्यक्ष कोमल भगवे, उपाध्यक्ष सृष्टी करंजुले, शिवसेना महिला शहर प्रमुख सुजाता पाटील, मनसेच्या डॉ. वैशाली साखरे, श्रीराम सेनेचे सुनील जाधव, भाजपचे सरचिटणीस राजेंद्र महाजन, विजय नरके, मनसेचे संदिप कडेकर, अविनाश घोगरे, सागर नरवडे, सावळाराम आवारी, सुधीर कडेकर, आकाश चाकणे, पत्रकार भाऊसाहेब खपके, बबन वाघमारे, सचिन जाधव यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
लेखी आश्वासनातील प्रमुख मुद्दे:
* पिण्याच्या पाण्यासाठी लवकरच दुसरी जागा निश्चित केली जाईल आणि तोपर्यंत दहा पिण्याच्या पाण्याचे रांजण ठेवण्यात येतील.
* बसस्थानकाच्या प्रवेश रस्त्याचे डांबरीकरण केले जाईल आणि रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य तातडीने हटवण्याच्या सूचना विकासकाला देण्यात येतील.
* शिरूर आगाराला पुढील महिन्याभरात दहा नवीन बस मिळतील.
* महिला स्वच्छतागृहात महिला कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाईल आणि स्वच्छतागृह सर्वांसाठी मोफत असेल असा फलक लावला जाईल.
* बाह्य मार्गाने जाणाऱ्या बसेस शिरूर आगारात आणण्याच्या सूचना देण्यात येतील.
* बसस्थानकात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दोन शिफ्टमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाईल.
* बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ नादुरुस्त बस उभ्या केल्या जाणार नाहीत.
* सर्व बसेस त्यांच्या निर्धारित फलाटावरच लागतील.
* कर्मचारी विश्रांतीगृहाची दुरुस्ती करून त्याचे योग्य नियोजन केले जाईल.
* बसस्थानकातील स्वच्छतेबाबत विकासकाला आवश्यक सूचना देण्यात येतील.
* बसस्थानकात ‘नाथजल’ पाण्याची बाटली १५ रुपयांना मिळेल याचे स्टिकर लावले जाईल.
शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, भाजप आणि शिवसेना महिला आघाडी यांनीही बसस्थानकाच्या समस्यांबाबत प्रशासनाकडे मागणी करून पाठपुरावा केला होता.
उपोषण स्थगित करताना सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे यांनी सांगितले की, लेखी आश्वासनानुसार जर महिनाभरात दहा आणि त्यानंतर दहा अशा एकूण वीस बस मिळाल्या नाहीत आणि दहा दिवसांच्या आत इतर समस्या सोडविल्या गेल्या नाहीत, तर ते पुन्हा उपोषण आंदोलन सुरू करतील.