हेडलाईन्स: शिरूरमध्ये सराफावर गोळीबार करून दहशत निर्माण करणारा सराईत गुंड MPDA अंतर्गत स्थानबद्ध!
शिरूर पोलीस ठाण्याची व पुणे ग्रामीण जिल्ह्यातील चालू वर्षातील पहिली मोठी कारवाई.

निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा
शिरूर शहर आणि परिसरात दहशत निर्माण करणारा, सराफावर गोळीबार करून तसेच गावठी पिस्तूल बाळगणारा सराईत गुंड शरद बन्सी मल्लाव (वय २५ वर्षे, रा. काचीआळी शिरूर) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी MPDA (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, गुंड व धोकादायक व्यक्तींच्या गैरकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९८१) कायद्याअंतर्गत स्थानबद्ध केले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या शिफारशीनुसार पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला. ही कारवाई शिरूर पोलीस ठाण्याची तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यातील या वर्षातील पहिली मोठी धडाकेबाज कारवाई आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद बन्सी मल्लाव हा शिरूर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील एक सक्रिय आणि सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाणे, रांजणगाव पोलीस ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे एकूण ०७ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बेकायदेशीरपणे अग्निशस्त्र बाळगणे, गंभीर व साधी दुखापत करणे, मारहाण व शिवीगाळ करणे, मालमत्तेचे जाळपोळ करून नुकसान करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गुन्हे करण्यासाठी इतरांना चिथावणी देणे, प्राणघातक हत्यारांनी सज्ज असताना जबरी चोरी किंवा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणे, अग्निशस्त्राचा वापर करून खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे आणि हिसकावून चोरी करणे यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
शरद मल्लाव याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच्या वारंवारच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या पार्श्वभूमीवर शिरूर पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. कायद्याच्या चौकटीत राहून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक होते. त्यानुसार, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी पुणे यांनी दिनांक ०८/०४/२०२५ रोजी शरद बन्सी मल्लाव याला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.
या आदेशानंतर शिरूर पोलिसांनी तातडीने हालचाल करत शरद मल्लाव याचा शोध सुरू केला. दिनांक ०९/०४/२०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता त्याला त्याच्या राहत्या ठिकाणाहून (काचीआळी, शिरूर) ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला स्थानबद्ध करण्यासाठी मध्यवर्ती कारागृह, आकोला येथे रवाना करण्यात आले आहे.
शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले की, शिरूर पोलिसांनी सन २०२४ आणि २०२५ या कालावधीत एकूण ०४ सराईत गुंडांना स्थानबद्ध केले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांना एक स्पष्ट इशारा मिळाला आहे. यापुढेही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार असून गुन्हेगारांची कोणतीही गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
या महत्त्वपूर्ण कारवाईमध्ये मा. पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), मा. रमेश चोपडे (अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग पुणे), मा. प्रशांत ढोले (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर उपविभाग), मा. संदेश केंजळे (पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस ठाणे), मा. अविनाश शिळीमकर (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण (शिरूर पोलीस ठाणे), सहा फौजदार महेश बनकर (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा), पोलीस हवालदार मंगेश थिगळे, परशराम सांगळे (शिरूर पोलीस ठाणे), पोलीस अंमलदार सचिन भोई, नाथसाहेब जगताप, नितेश थोरात, अजय पाटील, विजय शिंदे, निखील रावडे, रविंद्र आव्हाड आणि निरज पिसाळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.