रामनवमीच्या शुभ पर्वावर ‘स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे मार्गा’चे नूतनीकरण
शिरूरच्या सेवाभावी इतिहासाला उजाळा; समाजसेवा, वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रातील दीप अजूनही प्रज्वलित..!

शिरूर शहरातील समाजसेवा, वैद्यकीय सेवा आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांचा पाया घालणाऱ्या थोर व्यक्तिमत्त्वांमध्ये स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे यांचे नाव आजही अत्यंत आदराने घेतले जाते. रामनवमीच्या दिवशी ‘स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे मार्गा’चे पुन्हा एकदा नूतनीकरण करण्यात आले, ज्यामुळे शिरूरच्या दंतवैद्यक, समाजसेवा व राजकारणातील इतिहासाला अभिवादन करण्यात आले.
डॉ. नरवडे यांचा अद्वितीय प्रवास:
डॉ. नरवडे यांचा हवेलीपासून राजकारणापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांची ऐतिहासिक आणि आकर्षक हवेली हे केवळ एक घर नव्हते, तर ते एक सामाजिक, वैद्यकीय आणि राजकीय केंद्र होते. त्यांनी आपल्या घरात गरजू विद्यार्थ्यांसाठी स्वस्त दरात निवासाची सोय केली होती. शिरूर पंचायत समितीचे तत्कालीन सभापती स्व. बापूसाहेब थिटे याच हवेलीत राहायचे. माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांचेही या हवेलीत वास्तव्य झाले होते. शिरूर तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी याच हवेलीच्या अंगणात घडल्या.
समर्पित वैद्यकीय सेवा आणि दानशूर वृत्ती:
डॉ. नरवडे यांनी कधीही व्यवसायासाठी वैद्यकीय सेवा दिली नाही. गरीब रुग्णांकडून पैसे न घेता, “देतात तेवढेच घ्या” या तत्त्वावर त्यांनी उपचार केले. त्यांची माणुसकी आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
‘स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे मार्ग’:
डॉ. नरवडे यांच्या कार्याचा गौरव म्हणून सुमारे ३० वर्षांपूर्वी, जाकीरखान पठाण, तुकाराम खोले आणि शरद कालेवार यांच्या पुढाकारातून आणि गोविंद नरवडे यांच्या परवानगीने शिरूर शहरातील एका रस्त्याला ‘स्व. डॉ. बाळासाहेब नरवडे मार्ग’ असे नाव देण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या रस्त्याचे अनावरण झाले होते.
रामनवमीच्या दिवशी नूतनीकरण:
रामनवमीच्या दिवशी या रस्त्याच्या फलकाचे नूतनीकरण करण्यात आले. डॉ. नरवडे यांचे नातू सागर नरवडे आणि पणतू यशराज नरवडे यांनी हे नूतनीकरण केले. शिरूर पोलीस स्टेशनचे PI संदेश केंजळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला सुनील जाधव, तुकाराम खोले, मयुर नाहार, एजाज बागवान, मंगेश खांडरे, योगेश थोरात, शुभम शाहणे, पंकज जाधव, अविनाश घोगरे, परेश काळे, राहुल भोते, किरण काळे, अजित ठोंबरे, अस्लम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
नरवडे कुटुंबाचा वारसा:
नरवडे कुटुंबाने समाजात कधीही भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक दिली. “हा मोठा तो लहान नाही, सर्वजण आपलेच” ही त्यांची भावना होती. आजही त्यांचे नाव शिरूर, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यात “देवदूत” म्हणून घेतले जाते. त्यांची चौथी पिढी, श्रीहरी, सागर, जयकुमार आणि दत्ता, तसेच सागर नरवडे, यशराज नरवडे आणि आदित्य हा वारसा पुढे नेत आहेत.