शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कारवाई;अपघातात मृत्युस कारणीभुत होवुन पसार झालेल्या अज्ञात वाहन व चालकाच्या आवळल्या मुसक्या
निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कारवाई
शिरूर: दिनांक ११/०३/२०२५ रोजी दुपारी १२:३० वा. सुमारास शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे एका अज्ञात टेम्पो चालकाने रहदारी नियमांचे उल्लंघन करून निष्काळजीपणे आणि वेगात वाहन चालवले. यामुळे समोरून येणाऱ्या मोटरसायकल चालकाला धडक बसली, ज्यात करणसिंग ग्यारसिंग जमरे (वय ४९, रा. बडवाणी, जि. राजपुर, मध्य प्रदेश) यांचा मृत्यू झाला. तसेच, त्याच अपघातात टिकम जमरे हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यावर टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची नोंद शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक १६७/२०२५ अन्वये करण्यात आली होती.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक मा. श्री. संदेश केंजळे सो. यांनी तपास पथकाला अज्ञात वाहन आणि चालकाचा शोध घेण्याचे आदेश दिले. पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार नितेश थोरात आणि रवींद्र आव्हाड यांच्या पथकाने शिरसगाव काटा, पिंपळसुटी, निर्वी, तांदळी, काष्टी परिसरात सुमारे ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासाच्या आधारे, हे वाहन अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो (एम एच २५ ए जे ७६३७) असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी एक विशेष पथक तयार केले. सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप आणि पोलीस अंमलदार रवींद्र आव्हाड यांच्या पथकाने वारे वडगाव, ता. भूम, जि. धाराशिव येथे जाऊन अपघात केलेले वाहन आणि आरोपी चालक प्रितेश राजेंद्र गायकवाड (रा. वारे वडगाव, ता. भूम, जि. धाराशिव) याला ताब्यात घेतले. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम हे करत आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले आणि मा. पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. शुभम चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार नितेश थोरात आणि रवींद्र आव्हाड यांच्या पथकाने केली.