शिवपुत्र स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराजांची जयंती निमित्त विशेष लेख…!
निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

•||• छत्रपती राजाराम महाराजांची जयंती•||•
छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर मोघलांनी मराठ्यांची राजधानी रायगडला वेढा घातला होता. या वेढयातून सुटका करून घेत छत्रपती राजाराम महाराज रायगड – प्रतापगड – पन्हाळा असा खडतर प्रवास व अनेक संकटांचा सामना करीत तमिळनाडूतील जिंजीस पोहचले. छत्रपती राजाराम महाराजांचा दक्षिणेकडे जाण्याचा निर्णय राजकीय आणि युद्धशास्त्रीय दृष्टीने मराठयांसाठी फायद्याचा तर शत्रूंस घातक ठरला. छत्रपती राजाराम महाराज जिंजीस गल्यामुळे औरंगजेबाला आपले निम्मे सैन्य दक्षिणेकडे पाठवावे लागले. तर खुद्द औरंगजेब विजापूरजवळ गलगली येथे जाऊन राहिला. जिंजीस पोहचल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी ही मराठ्यांची नवीन राजधानी बनवली व तेथून राज्यकारभार सुरू केला.
छत्रपती राजाराम महाराज दक्षिणेकडे गेल्याने स्वराज्यातील मोगल सैन्याचा प्रभाव कमी झाला. राजाराम महाराजांनी जिंजीतून मोगलांविरुद्ध मोहिमांचे नियोजन सुरू झाले. त्याचा परिणाम असा झाला की मराठ्यांनी गेलेले किल्ले व प्रदेश जिंकण्याचा सपाटाच सुरू केला.
छत्रपती राजाराम महाराज यांच्या कालखंडात मराठ्यांना आपला पराक्रम गाजवायला दक्षिण आणि उत्तर विस्तृत असे युद्धक्षेत्र लाभले. संताजी घोरपडे, धनाजीराव जाधव, शंकराजी नारायण, रामचंद्रपंत अमात्य, नेमाजी शिंदे, कृष्णा सावंत या शिलेदारांनी याच कालखंडात आपला पराक्रम गाजवून मोगलांना सळो-की-पळो करून सोडले.
छत्रपती राजाराम महाराज यांच्या मुलकी, लष्करी आणि प्रशासकीय बदलामुळे अनेक मराठा सरदार मोगलांची बाजू सोडुन स्वराज्यात सामील झाले. १६९८ साली छत्रपती राजाराम महाराज जिंजीतून परतले तेव्हा खानदेश, वर्हाड, बागलाण या भागात मराठ्यांनी आणखी जोराने आक्रमण केली व मराठे नर्मदा पार गेले.
औरंगजेबचा मनसबदार मिर्झा मुहंमद आपल्या ‘तारीखे मुहंमदी’ या ग्रंथात राजाराम महाराजांबद्दल लिहितो, “शहाजीचा नातू व शिवाजीचा मुलगा रामजी उर्फ रामराजा याने आपला भाऊ संभाजी यांच्या मृत्युनंतर दक्षिणेत मोठे तेज व धाडस दाखविले”
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल ११ वर्ष स्वराज्याची धुरा यशस्वीरित्या सांभाळणारे आणि दिल्ली जिंकण्याची मनिषा बाळगणारे, स्वराज्याचे तिसरे छत्रपती, शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐