मराठ्यांचे सेनापती अण्णासाहेब पाटील: माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे आणि मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे झुंजार नेत्याच्या जयंतीनिमित्त विशेष लेख..
निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

महाराष्ट्राच्या मातीतील एक तेजस्वी तारा: अण्णासाहेब पाटील
महाराष्ट्राच्या भूमीला पराक्रमी पुरुषांची आणि समाजाला एकतेच्या सूत्रात बांधून ठेवणाऱ्या महापुरुषांची मोठी परंपरा लाभली आहे. या मातीने आपल्या देशाला देश, देव, धर्म रक्षणासाठी लढणाऱ्या वीर पुरुषांच्या काळानुरुप मालिका निर्माण झालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या थोर परंपरेमध्ये अजरामर राहिलेले आणि सामान्य माणसांच्या मनात कायम कोरलेलं नाव म्हणजे मराठ्यांचे सेनापती अण्णासाहेब पाटील हे आहेत.
मराठा समाजाला नवी ओळख देणारे अण्णासाहेब
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र भूमीत राहणारा आणि मातीच्या रक्षणासाठी लढणारा व महाराष्ट्राच्या वैभवासाठी संघर्ष करणारा प्रत्येक माणूस मराठा आहे, अशी विशाल व साधी सोपी संकल्पना अण्णासाहेब पाटील यांनी मांडली होती. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड बारा बलुतेदार हिंदूंना मराठा या विशाल संकल्पनेत भगव्या ध्वजाखाली एकत्र आणले होते, त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्राच्या भूमीला अपेक्षित असणारी मराठ्यांची व्याख्या करून देश, देव, धर्मची प्रतिबध्दता व्यक्त केली. शिवरायांच्या कल्पनेतील मराठा शब्दाला अनुसरून त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली होती म्हणूनच अण्णासाहेब पाटील यांना मराठ्यांचा खरा सेनापतीसुध्दा म्हटले जाते.
माथाडी कामगारांसाठी जीवन समर्पित
अण्णासाहेब पाटील यांचा जन्म दि. 25 सप्टेंबर, 1933 रोजी पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे येथे शेतकरी कुटुंबात झाला आणि शिक्षण सांगली येथे झाले. त्यांना सामाजिक कार्य करण्याची जन्मजात आवड असल्याने शिक्षण आटोपून ते मुंबई येथे स्थायिक झाले. तेंव्हा कामगारांची अवस्था बिकट होती, न्याय मिळत नव्हता म्हणून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी माथाडी कामगार संघटना स्थापन केली. पुढे तर विधान परिषदेचे सदस्य सुध्दा होते.
माथाडी कामगार संघटनेची स्थापना आणि यश
प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे अण्णासाहेब पाटील आपलं शिक्षण अपूर्ण सोडून मुंबईमध्ये दाखल झाले, तेव्हा कामगारांची अवस्था अत्यंत बिकट होती, श्रमाचे योग्य मूल्य मिळत नव्हते. त्यामुळे अण्णासाहेब पाटील यांनी विखुरलेल्या कष्टकरी कामगारांना एकत्र करून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा उभारला. माथाडी कामगार संघटना उभी केली. कामगारांना पुरेसे वेतन, आरोग्य सुविधा, हक्क व सामाजिक सुरक्षा मिळण्यासाठी लढा उभा केला. सरकार दरबारी कष्टकरी माथाडी कामगारांच्या व्यथा मांडून त्यांच्या हक्कांसाठी जीवाचे रान केले. अण्णासाहेब पाटील यांचा जनरेटा इतका प्रभावी होता की, तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण करून माथाडी कामगार संघटनेला शासकीय दर्जा प्राप्त करून दिला आणि दि. 05 जून, 1969 रोजी महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे माथाडी कामगारांच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ लागले. माथाडी कामगार कायद्याबरोबरच नवीमुंबईमध्ये माथाडी हॉस्पिटल, माथाडी पतपेढी, माथाडी ग्राहक सोसायटी, सिडकोमार्फत घरे, उच्च शिक्षण, वैद्यकीय सेवा अशा माथाडी कामगारांसाठी कल्याणकारी योजना का असू नयेत? यास्तव अण्णासाहेब पाटील यांनी अशा तऱ्हेच्या माथाडी कामगार कल्याणकारी संस्था निर्माण केल्या. अशा विविध सुविधांमुळे कामगार व त्यांच्या परिवारांचे जीवनमान उंचावले गेले आहे आणि त्यांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच माथाडी कामगार क्षेत्रात अण्णासाहेब पाटील यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
मराठा आरक्षणासाठी बलिदान
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अण्णासाहेब पाटील यांनी २२ मार्च १९८२ रोजी मुंबईत विधानभवनावर मोर्चा काढला होता. या मोर्चात मराठा समाजातील हजारो लोक सहभागी झाले होते. अण्णासाहेब पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना नऊ मागण्यांचे निवेदन सादर केले होते. आरक्षणाच्या मागणीचा विचार होणार नसल्याचे लक्षात येताच अण्णासाहेब पाटील यांनी २३ मार्च १९८२ रोजी आत्महत्या केली.
हिंदुत्वाची प्रतिबध्दता
विधान परिषदेचे आमदार असलेल्या अण्णासाहेब पाटील यांनी शिवरायांचा भगवा ध्वज हातामध्ये घेऊन “चलो विधाभवन” ची गर्जना केली होती, दि. २२ मार्च, १९८२ रोजी आपल्या नऊ मागण्याचे निवेदन घेऊन विधान भवनावर विशाल मोर्चा काढला होता. आपल्या नऊ मागण्यांमध्ये त्यांची हिंदुत्वनिष्ट विचारांची प्रतिबध्दता दिसून येते. त्यांनी आपल्या मागण्यांमध्ये आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणसह देशाला सतत भेडसावणा – या समस्यांवर उपाय शोधणा – या पुढील मागण्या सुध्दा केल्या होत्या. (१) समान नागरी कायदा बनवून ताबडतोब लागू करा, (२) धर्मांतरावर बंदी घाला, (३) भिवंडी व कल्याणमधील शिवजयंती मिरवणुकीवरील बंदी ताबडतोब उठवा. अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईमध्ये काढलेल्या मोर्चामध्ये उपरोक्त तीन मागण्यां करुन त्यांनी आपली देश, देव, धर्म यासाठी लढणारी किंवा हिंदूत्वासाठी संघर्ष करण्याची प्रतिबध्दता व्यक्त केली होती.
अण्णासाहेब पाटील: एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व
अण्णासाहेब पाटील यांच्या जीवनकार्याचा विचार केल्यास किंवा मागोवा घेतल्यास असे लक्षात येते की, त्यांचं संपूर्ण आयुष्य समाजासाठी संघर्ष करण्यात खर्ची झालेलं असून, ख – या अर्थाने ते मराठ्यांचे खरे सेनापती ठरतात तसेच त्यांचा माथाडी कामगार संघटना स्थापनेपासून विधा परिषदेचे सदस्य असा खडतर प्रवास महाराष्ट्रामधील प्रत्येक माणसाला प्रेरणा देणार आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या ९१ व्या जयंती दिनानिमित्त मराठ्यांचा खरा सेनापती असलेल्या अण्णासाहेब पाटील यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन…!!
माहिती संकलन सोशल मीडिया साभार
विशेष आभार..
अखिल भारतीय मराठा महासंघ
पोपटराव उपाख्य नानासाहेब देशमुख
मुंबई