मोठी बातमी:आता वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित इंजेक्शन, आय.आय.टी मुंबई संशोधकाकडून संशोधन
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्त सेवा

मोठी बातमी:आता वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित इंजेक्शन, आय.आय.टी मुंबई कडून संशोधन
वैद्यकीय उपचारासाठी इंजेक्शन घ्यायचे म्हटले की, लहानांपासून मोठ्यापर्यंत हा प्रसंग अंगावर काटा आणणारा ठरतो. काही रुग्णांमध्ये इंजेक्शन घेण्याची भीती इतकी प्रबळ असते की, रुग्ण उपचार घेण्यास नकार देतात. मधुमेह रुग्णांना सतत इन्शुलिन इंजेक्शन घ्यावी लागतात, अशा पेशंटला मोठ्या त्रासातून जावे लागते.
मात्र आता मुंबई आय.आय.टी. च्या संशोधकांनी यावर उपाय शोधला आहे. संशोधकांनी शॉकवेव्ह नावाची एक सिरीज विकसित केली असून,ती वेदनाविरहित आहे.
या सिरीज च्या साह्याने दाब देऊन शरीरात इंजेक्शन देता येते. त्यामुळे दुखापत आणि संसर्गाचा धोका देखील कमी असल्याचा दावा आयआयटी संशोधकांनी केला आहे.
मुंबई आयआयटी एरोस्पेस अभियांत्रिकी विद्यालयातील प्राध्यापक- विरेन मेनेझेस यांच्या नेतृत्वाखाली संशोधकाच्या गटाने सुई न टोचता शरीरात औषध सोडण्याचे तंत्र’शॉक सिरीज ‘ वापरून विकसित केले आहे.जर्नल ऑफ बायो मेडिकल मटेरियल अँड डिव्हाइसेस त्याचा अभ्यास प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात त्यांनी शॉक सिरीजद्वारे दिलेले औषध आणि प्रयोगशाळेतील उंदरावर इंजेक्शनच्या सुईने इंजेक्शन दिलेल्या औषधाची तुलना केली. नेहमीचे सुईसह असलेले इंजेक्शन त्वचेवर जोरात टोचल्यास त्वचेवर किंवा त्वचेखालील ऊतीवर आघात होवू शकतो. इंजेक्शनमुळे ऊतीचे कमीतकमी नुकसान व्हावे या साठी शॉक सिरीज महत्वपूर्ण ठरते.
शॉकवेव्ह सीरिजमध्ये आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणारी उच्च ऊर्जा असलेले आघात तरंग वापरून त्वचेला छिद्र पाडले जाते. सिरीजच्या तोंडाच्या क्षेत्राची रुंदी फक्त 125 मायक्रोमीटर म्हणजे मानवी केसाच्या जाडीएवढी ठेवली आहे. तोंड लहान असल्याने इंजेक्शन आत जाताना त्रास होत नसल्याचे पी एच डी च्या विद्यार्थिनी आणि अभ्यासाच्या प्रमुख लेखिका प्रियांका हंकारे यांनी सांगितले आहे.
शॉक सिरीज मध्ये एक सूक्ष्म आघात नलिका असून त्याचे तीन भाग आहेत.ड्रायव्हर, ड्राईव्ह करण्याचा भाग आणि औषध धारक भाग.हे तिन्ही भाग एकत्रितपणे काम करून आघात तरंगाच्या माध्यमातून अतिसूक्ष्म फवारा तयार करतात.हा फवारा शरीरात औषध पसरवतो. या फवाऱ्याचा वेग विमान उडण्याच्या वेळी असणाऱ्या वेगापेक्षा दुप्पट असतो.हा द्रवरूपी औषधाचा फवारा सिरिजच्या तोंडातून बाहेर पडून त्वचेला भेदून शरीरात जातो. ही संपूर्ण प्रक्रिया रुग्णाला काही कळण्याच्या आत वेगाने आणि सौम्य पणे पार पडते.