वैद्यकीय क्षेत्र धोक्यात: बोगस शस्त्रक्रिया, अवयव तस्करी आणि कोट्यवधींचे घोटाळे.!
नवी दिल्ली: भारताचे वैद्यकीय क्षेत्र लवकरच कोलमडणार आहे, असा स्पष्ट इशारा खुद्द भारताच्या संसदीय समितीने ९ मार्च २०१६ रोजी दिला होता. आता झी न्यूजच्या एका ताज्या संशोधन अहवालाने या धोक्याची पुष्टी केली आहे. या अहवालानुसार, भारतात तब्बल ४४% मानवी शस्त्रक्रिया बोगस, अनावश्यक किंवा केवळ रुग्णांचे आणि सरकारचे पैसे लुटण्यासाठी केल्या जातात.
हृदय शस्त्रक्रिया सर्वाधिक बोगस: धक्कादायक बाब म्हणजे, या अहवालात पुढे असे वर्गीकरण करण्यात आले आहे की, भारतात होणाऱ्या ५५% हृदय शस्त्रक्रिया बनावट असतात. याशिवाय, ४८% हिस्टेरोक्टोमी (गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया), ४७% कर्करोग शस्त्रक्रिया, ४८% गुडघे प्रत्यारोपण आणि ४५% सिझेरियन शस्त्रक्रिया देखील अनावश्यकपणे केल्या जातात. खांदेरोपण आणि स्पाइन सर्जरीसारख्या शस्त्रक्रियांच्या बाबतीतही गंभीर परिस्थिती आहे.
मोठ्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना कोट्यवधींचे वेतन:
बीएमजे ग्लोबल हेल्थच्या अभ्यासानुसार, महाराष्ट्रातील अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये वरिष्ठ डॉक्टरांचे मासिक वेतन एक कोटी रुपयांपर्यंत असते. जास्त तपासण्या, उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यास रुग्णांना प्रवृत्त करणाऱ्या डॉक्टरांना मोठे वेतन दिले जाते, जेणेकरून रुग्णालयांचा व्यवसाय वाढेल.
मृत रुग्णांवर उपचार आणि अवयव तस्करी: टाईम्स ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार, रुग्णांकडून अधिक पैसे उकळण्यासाठी मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार करण्याचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. एका प्रकरणात, एका १४ वर्षीय मृत युवकाला एका नामांकित हॉस्पिटलमध्ये महिनाभर व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार केले आणि नंतर त्याला मृत घोषित केले. तक्रारीनंतर हॉस्पिटल दोषी आढळले आणि त्यांनी कुटुंबाला पाच लाख रुपये भरपाई दिली.
याहूनही भयानक प्रकार म्हणजे मृत रुग्णांवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचे नाटक करून त्यांच्या कुटुंबीयांकडून मोठी रक्कम उकळली जाते आणि शस्त्रक्रिया करताना रुग्ण दगावल्याचे घोषित केले जाते, असे ‘डिसेंटिंग डायग्नोसिस’ या पुस्तकात डॉ. गाडरे आणि शुक्ला यांनी नमूद केले आहे.
मेडिक्लेम घोटाळा आणि काळ्या यादीतील रुग्णालये: मेडिक्लेम इन्शुरन्समध्येही मोठा घोटाळा होत आहे. सुमारे ६८% लोकांकडे मेडिक्लेम असूनही, गरज पडल्यावर अनेक युक्त्या वापरून त्यांचा क्लेम नाकारला जातो किंवा कमी रक्कम दिली जाते. खोटे क्लेम करणाऱ्या सुमारे तीन हजार नामांकित रुग्णालयांना मोठ्या विमा कंपन्यांनी काळ्या यादीत टाकले आहे. कोरोना काळात अनेक मोठ्या हॉस्पिटल्सनी बनावट कोरोना केसेस दाखवून विमा कंपन्यांना कोट्यवधींचा चुना लावला.
मानवी अवयवांची तस्करी हा आणखी एक घृणित व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. इंडियन एक्सप्रेसने २०१९ मध्ये उघडकीस आणलेल्या एका घटनेनुसार, कानपूरच्या संगीता कश्यप यांना नोकरीच्या बहाण्याने दिल्लीला बोलावून त्यांचे आरोग्य तपासणीसाठी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. शेजारच्या खोलीतील डॉक्टरांचे संभाषण ऐकल्यानंतर त्यांना अवयव तस्करीच्या टोळीचा संशय आला आणि त्या हॉस्पिटलमधून पळून गेल्या. या प्रकरणात पोलिसांनी डॉक्टर, मेडिकल स्टाफ आणि पोलिसांसह एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला.
हॉस्पिटल रेफरल आणि डायग्नोसिस स्कॅम: ‘हॉस्पिटल रेफरल स्कॅम’ हा तर सर्रास चालणारा प्रकार आहे. डॉक्टर रुग्णांना गंभीर आजार असल्याचे सांगून मोठ्या हॉस्पिटल्समध्ये पाठवतात, जिथे त्यांना प्रत्येक रेफरलमागे मोठी रक्कम मिळते. मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलने तर वार्षिक रुग्ण पाठवण्यानुसार डॉक्टरांना कमिशन देण्याची लेखी योजना जाहीर केली होती.
‘डायग्नोसिस स्कॅम’मध्ये डॉक्टर रुग्णांना अनावश्यक तपासण्या करण्यास सांगतात आणि त्यातून ४०-५०% कमिशन मिळवतात. बेंगळूरुमध्ये आयकर विभागाने केलेल्या छाप्यांमध्ये अनेक पॅथोलॉजी लॅब्सकडे कोट्यवधी रुपये आणि सोने सापडले, जे डॉक्टरांना देण्यासाठी ठेवले होते. देशात दोन लाखांहून अधिक लॅब्स कार्यरत असून त्यापैकी केवळ एक हजार प्रमाणित आहेत.
फार्मा कंपन्या आणि रुग्णालयांचे साटेलोटे: फार्मा कंपन्या डॉक्टरांना आपल्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात. डोलो गोळी बनवणाऱ्या कंपनीने डॉक्टरांना एक हजार कोटी रुपये दिल्याचे उदाहरण जगजाहीर आहे. USV LTD. सारख्या कंपन्या डॉक्टरांना विदेश दौरे आणि मोठी रक्कम देतात.
हॉस्पिटल्स आणि फार्मा कंपन्यांच्या संगनमतातून औषधे आणि सर्जिकल साहित्य रुग्णालयांना कमी दरात पुरवले जाते, परंतु त्यावर प्रचंड एमआरपी छापून रुग्णांकडून मोठी रक्कम वसूल केली जाते. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, EMCURE कंपनीचे कर्करोगाचे औषध रुग्णालये १९५० रुपयांना खरेदी करून १८६४५ रुपयांना विकतात.
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची निष्क्रियता: मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (MCI) ही डॉक्टर आणि हॉस्पिटल्सवर नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था असूनही, २०१६ मध्ये केंद्र सरकारने नेमलेल्या समितीने स्पष्ट केले की, MCI नवीन मेडिकल कॉलेजना परवानगी देण्यात अधिक रस दाखवते, परंतु डॉक्टर आणि हॉस्पिटल्सवर नियंत्रण ठेवण्यात हेतुपुरस्सर दुर्लक्ष करते. डॉक्टर MCI च्या नियमांचे सर्रास उल्लंघन करतात, परंतु याची माहिती जनतेला नसते. उदा. डॉक्टरांनी जेनेरिक औषधे लिहिणे, उपचारापूर्वी फी सांगणे, रुग्णांची संमती घेणे, मेडिकल रेकॉर्ड जतन करणे आणि भ्रष्ट डॉक्टरांविरुद्ध आवाज उठवणे या नियमांचे पालन केले जात नाही.
शासकीय योजनांमधील घोटाळा: शासकीय योजनांमध्येही मोठा घोटाळा होत आहे. माजी सैनिकांना किरकोळ आजार असला तरी हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्या नावे सरकारी योजनांमधून लाखो रुपये काढले जातात.
हा गंभीर प्रकार जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून प्रत्येकजण या धोक्यांपासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करू शकेल.
निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.