शिरूर: शिरूर पोलिसांनी एका १० वर्षाच्या अपहरण झालेल्या बालिकेची मुंबईतून सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.
घटनेचा तपशील:
दिनांक १३/०३/२०२५ रोजी शिरूर येथील जोशीवाडी परिसरातून १० वर्षाची मुलगी बेपत्ता झाली होती. अज्ञात आरोपींनी तिला अज्ञात कारणांसाठी, काहीतरी आमिष दाखवून पळवून नेले होते. या घटनेची तक्रार शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला होता.
पोलिसांची तत्परता आणि तपास:
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक मा. श्री. संदेश केंजळे यांनी तपास पथकाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड यांच्या पथकाने शिरूर शहरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
आरोपींची ओळख
तपासादरम्यान, आरोपी १) लताबाई बसीर काळे २) आकाश बसीर काळे ३) सुप्रिया उर्फ रॅम्बो आकाश काळे, सर्व रा. सोनेसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे यांनी पीडित मुलीला दुचाकीवरून अपहरण करून नेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
मुलीची सुटका:
आरोपींनी मुलीला मुंबईतील बेलापूर येथे नातेवाईकांकडे ठेवले होते. मुलगी आपलीच असल्याचे सांगून त्यांनी नातेवाईकांना खोटी माहिती दिली होती. पोलीस निरीक्षक मा. श्री. संदेश केंजळे यांनी एक विशेष पथक तयार करून बेलापूर, मुंबई येथे पाठवले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, महिला पोलीस अंमलदार गीता सुळे यांचा समावेश होता. या पथकाने तात्काळ कार्यवाही करत मुलीची सुखरूप सुटका केली आणि तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
पोलिस पथकाचे कौतुक:
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले आणि मा. पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक श्री. शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथ जगताप, महिला पोलीस अंमलदार गीता सुळे, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, नीरज पिसाळ, रवींद्र आव्हाड, सचिन भोई, अजय पाटील यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे एका निष्पाप मुलीला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबाकडे परत पाठवता आले.
निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.