शिरूर शहरात पोलिसांचा रूट मार्च, शांतता समितीची बैठक
निर्भय न्यूज लाईव्ह: शिरुर प्रतिनिधी

शिरूर शहरात पोलिसांचा रूट मार्च, शांतता समितीची बैठक
शिरूर: नागपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलिसांनी शहरात रूट मार्च काढला. तसेच, शहरातील शांतता कायम रहावी यासाठी हिंदू समाज, मुस्लिम समाज आणि शांतता समिती सदस्यांची बैठक घेतली.
21 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7:20 वाजता शिरूर पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरातून रूट मार्च काढला. या रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशनपासून बीजे कॉर्नर, पाचकंदील चौक, सुभाष चौक, एस स्टँड, इंदिरा गांधी पुतळा, विद्याधाम शाळा, बीजे कॉर्नर, तहसील कार्यालय मार्गे पोलीस स्टेशनपर्यंतचा मार्ग समाविष्ट होता. या रूट मार्चमध्ये शिरूर पोलीस स्टेशनमधील 4 पोलीस अधिकारी आणि 30 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
दुसऱ्या दिवशी, 22 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शिरूर पोलीस स्टेशनमध्ये हिंदू समाज, मुस्लिम समाज आणि शांतता समिती सदस्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तरुणांनी सोशल मीडियावर प्रक्षोभक संदेश पोस्ट करू नयेत, तसेच इतर वादग्रस्त संदेश शेअर करू नयेत किंवा त्यावर प्रतिक्रिया देऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या. राजकीय, सामाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य कोणाकडूनही होऊ नये, याची काळजी घेण्यास सर्वांना सांगण्यात आले.