शिरूर तालुक्यातील कवठे येमाई मधील यात्रेत तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; पूर्ववैमनस्यातून मारहाण..
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

शिरूर, दि. १३: शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे काल (दि. १२) झालेल्या यात्रेत एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. संतोष बबन भाईक (वय २४, व्यवसाय शेती, रा. कवठेयेमाई) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये संभाजी विष्णु भाईक (रा. कवठेयेमाई) याच्या विरोधात भा.दं.वि. कलम ११८(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष भाईक आणि त्याचे मित्र उज्वल मुंजाळ, अरविंद तिकोळे, रामदास मुजाळ, भाऊ योगेश भाईक हे १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास कवठे येमाई येथील यात्रेत गेले होते. संतोष हा यात्रेत ताशा वाजवत असताना आरोपी संभाजी भाईक याने मागील भांडणाच्या कारणावरून त्याच्या हातातील लोखंडी रॉडने संतोषच्या डोक्यावर आणि मानेवर मारून त्याला गंभीर दुखापत केली.
या घटनेनंतर संतोषने तात्काळ शिरूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन आरोपी संभाजी भाईक याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे (क्रमांक १८९८) हे करत आहेत. प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या घटनेमुळे कवठे येमाई परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.