रांजणगाव MIDC: ग्रामपंचायतीत दस्तऐवजांत फेरफार करून फसवणूक, तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आणि वसुली लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल!
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

रांजणगाव MIDC (शिरूर): रांजणगाव ग्रामपंचायतीमधील शासकीय दस्तऐवज आणि अभिलेखांमध्ये बनावटगिरी करून फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आणि वसुली लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २००९-२०१० दरम्यानच्या नमुना आकारणी रजिस्टरमध्ये फेरफार झाल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत बाळासाहेब रामचंद्र गावडे (वय ४८, व्यवसाय नोकरी, विस्तार अधिकारी, पंचायत समिती शिरूर, मु.पो. मलठण, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २००९-२०१० या वर्षातील नमुना आकारणी रजिस्टरमधील नमुना क्र. ८ ची तपासणी केली असता, त्यात मिळकत क्र. ६२२/१ आणि ६२२/२ या मिळकती आनंदराव दिनकर पाचुंदकर यांच्या नावावर नोंदवलेल्या दिसल्या. मात्र, हे पान रजिस्टरच्या मूळ पानावर वरून दुसरे अतिरिक्त पान चिकटवून त्यात फेरफार केल्याचे निदर्शनास आले आहे.
याशिवाय, १९६०-१९६१ च्या आकारणी यादी नमुना क्र. ७ च्या रजिस्टरमधील नोंदी तपासल्या असता, त्यात अ.क्र. ५१ मिळकत १.१.F.-I (एकीकृत अन्वेषण फॉर्म न. ३४अ) आणि अ.क्र. ५२ मिळकत क्र. ३५ या आनंदराव दिनकर पाचुंदकर यांच्या नावाने नोंदवलेल्या आहेत. त्यांच्या नावाच्या खालील पानांवरील उर्वरित नोंदी अस्पष्ट आणि वाचता न येण्याजोग्या असून, त्यातही फेरफार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या फेरफारामुळे ग्रामपंचायतीची फसवणूक झाली असून, पंचायत समितीच्या चौकशी अहवालानुसार, तत्कालीन ग्रामसेवक, तत्कालीन सरपंच आणि वसुली लिपिक (सर्व रा. रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी आपापसात संगनमत करून शासकीय दस्तऐवज व रजिस्टरमध्ये बनावटगिरी करून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी ११ जून २०२५ रोजी रात्री ८:१० वाजता रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रार क्रमांक १९०/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ४२० (फसवणूक), ४६७ (बनावट दस्तऐवज तयार करणे), ४६८ (फसवणुकीच्या उद्देशाने बनावट दस्तऐवज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तऐवज वापरणे) आणि ३४ (सामूहिक उद्देश) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची नोंद पोलीस स्टेशन डायरी क्रमांक २६/२०२५ अशी करण्यात आली आहे. पो. हवा. हुडे न-२३३७ यांनी हा गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.