हेडलाईन्स: * कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची पुणे ग्रामीणला भेट; वार्षिक तपासणी आणि गुन्हे आढावा बैठक संपन्न

पोलीस पाटलांचा सत्कार, उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार, आणि उद्योजकांच्या समस्यांवर चर्चा..
पुणे, दि. २९ एप्रिल, २०२५: कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, मा. श्री. सुनिल फुलारी यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलाला वार्षिक तपासणी निमित्त भेट दिली. यावेळी पुणे ग्रामीण पोलीस दल मुख्यालय येथे सकाळी ७.३० वाजता विशेष परेड आयोजित करण्यात आली होती. या परेडमध्ये मा. श्री. पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना मानवंदना दिली. त्यानंतर, श्री. फुलारी यांनी परेडचे निरीक्षण केले. रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी परेडचे नेतृत्व केले. परेडमध्ये पी.टी. क्लास, लाठी ड्रिल, गार्ड ड्रिल, बी.डी.डी.एस प्रात्यक्षिक आणि जमाव विसर्जन प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारी १०.३० वाजता भिमाशंकर हॉल, पाषाण रोड, पुणे येथे वृंद परिषद घेण्यात आली. या परिषदेत विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल सत्कार केला. जिल्हा पोलीस पाटील संघटनेनेही त्यांचा सत्कार केला. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील डी.जे. मुक्त आणि एक गाव एक गणपती उपक्रम राबवणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले.
२०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणाऱ्या उत्कृष्ट महिला व पुरुष पोलीस पाटलांचा देखील सत्कार करण्यात आला. पोलीस दलात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
२८ एप्रिल, २०२५ रोजी १०० दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये उत्कृष्ट काम करणारे पोलीस स्टेशन म्हणून रांजणगाव पोलीस स्टेशनची निवड झाली होती. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी रांजणगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली आणि तेथील उद्योजकांशी संवाद साधला. उद्योजकांनी आपल्या समस्या मांडल्या आणि त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी उत्कृष्ट काम करणारे पोलीस स्टेशन, गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धी मिळवणारे अधिकारी आणि मालमत्ता जप्त करणारे अधिकारी-कर्मचारी यांनाही सन्मानित करण्यात आले.
याव्यतिरिक्त, खालील गुन्हे उघडकीस आणणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला:
* शिकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील आरणगाव येथे वृद्ध दांपत्याचा दरोडा व खून
* हवेली पोलीस स्टेशन हद्दीतील बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण व खून
* राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील निरा नदीत आढळलेल्या अनोळखी पुरुषाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणणे
* खेड पोलीस स्टेशन हद्दीतील दोन अल्पवयीन मुलींचा खून
* यवत पोलीस स्टेशन हद्दीतील चव्हाण मळ्यातील दरोडा व खून
विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी मार्गदर्शन केले. न्यायालयात दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्याबाबत त्यांनी जिल्हा सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील यांच्यासोबत चर्चा केली.
पत्रकार परिषदेत बोलताना, विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
जनसंपर्क अधिकारी, पुणे ग्रामीण यांनी ही माहिती दिली.