शिरूर पोलीस स्टेशनमध्ये महिला दिनाचा उत्साह: महिला पोलिसांची बाईक रॅली आणि साडी भेट!
निर्भय न्यूज लाईव्ह: प्रतिनिधी

निर्भय न्यूज लाईव्ह: प्रतिनिधी
शिरूर ८ मार्च: जागतिक महिला दिनानिमित्त शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आज (दि. ८) मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला. पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी पोलीस स्टेशनमधील सर्व महिला पोलिसांना फेटे बांधून साडी भेट दिली. याप्रसंगी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बाईक रॅली काढली, ज्यामध्ये महिला सबलीकरणाचा संदेश देण्यात आला.
पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे म्हणाले, “महिला पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्याबरोबरच कुटुंबाची जबाबदारीही उत्तमरित्या सांभाळतात. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे.”
महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बाईक रॅलीच्या माध्यमातून शिरूर शहरात जनजागृती केली. या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिला पोलीस कर्मचारी म्हणाल्या, “पोलीस स्टेशनमधील सहकाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी आज आमचा सन्मान केल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. या कार्यक्रमामुळे आम्हाला आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”