शिरूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका १९ वर्षीय तरुणाकडून सुमारे २२ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त केले आहे. पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून एक मोटारसायकलसह एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी ड्रग्जप्रकरणी केलेली ही पहिलीच मोठी कारवाई असल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.
काय आहे प्रकरण?
शिरूर शहरातील नवीन नगरपालिका परिसरात एक तरुण ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिरूर पोलिसांनी सापळा रचून पवन सागर भंडारे (वय १९, रा. वाडा कॉलनी, शिरूर) या तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २२ हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज आढळून आले. पोलिसांनी तात्काळ ड्रग्ज आणि त्याची मोटारसायकल जप्त करून पवन भंडारेला अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, आणि पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक करांडे, पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटीग, शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, हवालदार नितीन सुद्रिक, पोलीस अमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, सचिन भोई, निरज पिसाळ,इतर कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
अटक केलेल्या पवन भंडारेला १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक करांडे करत आहेत. या घटनेमुळे तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात सापडत असल्याबद्दल नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
निर्भय न्यूज लाईव्ह, हे एकमेव निर्भीड न्यूज पोर्टल आहे. निर्भय न्यूज लाईव्ह हे सर्व क्षेत्रातील बातम्या, निर्भयपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम आहे.अर्थातच आपल्या सर्वांची साथ तितकीच महत्त्वाची आहे.!आपल्या परिसरातील बातम्या व जाहिराती साठी आपण ८१४९२३२२३५ या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.