रांजणगाव एमआयडीसीतील यश इन चौक : तळीरामांचा अड्डा आणि वेश्या व्यवसायाचे केंद्र?
"पोलिसांनी केवळ कारवाईचा फार्स न करता, खऱ्या अर्थाने या अवैध धंद्यावर कारवाई करावी".!!.

🔥अवैध धंद्याचा हॉटस्पॉट ठरलेला यश इन चौक 🔥👆
निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा कारेगाव (दिनांक ०५/०४/२५)
रांजणगाव औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार असलेल्या कारेगाव येथील यश इन चौकात सध्या बेकायदेशीर कृत्यांचे प्रमाण वाढले आहे. या चौकात खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा आणि तळीरामांचा मोठा अड्डा बनला असल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. या ठिकाणी असलेल्या वाईन शॉपमुळे सायंकाळच्या वेळी तळीरामांची मोठी गर्दी जमते आणि ते भर रस्त्यात दारू पितात, ज्यामुळे महिला कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रांजणगाव पोलिस स्टेशन आणि पोलिस उपविभागीय कार्यालय या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर असूनही, या बेकायदेशीर कृत्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत, “पोलिसांच्या आशीर्वादानेच हे सर्व सुरू आहे का?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. यापूर्वी याच परिसरात वेश्या व्यवसाय सुरू होता, ज्यावर पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयातील एका अधिकाऱ्याने कारवाई केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा या परिसरात बेकायदेशीर कृत्ये सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वाईन शॉप चालकाचा हस्तक्षेप.?
मिळालेल्या माहितीनुसार, वाईन शॉप चालक पोलिसांना या ठिकाणी थांबण्यास विरोध करतात, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो. यामुळे, पोलीस या गैरकृत्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. रांजणगाव एमआयडीसीमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांना या सर्व प्रकारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बाजार तळ परिसरातील आणि यश इन चौकातील, रांजणगाव गणपती परिसरातील अनेक लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. यावर रांजणगाव पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
जेष्ठ नागरिकांची प्रतिक्रिया : “पोलिसांनी ठरवलं तर, हे दोन नंबरचे धंदे सुतासारखे सरळ होतील!”
कारेगाव (निर्भय न्यूज लाईव्ह : वृत्तसेवा) : गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांवर प्रतिक्रिया देताना एका जेष्ठ नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर धक्कादायक आरोप केले आहेत. ३१ मार्च रोजी गुटखा जप्त केल्याची घटना आणि ४ एप्रिल शिक्रापूरमधील ऐश्वर्या लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायावरील कारवाई या दोन्ही घटना केवळ “चिरीमिरी” न मिळाल्याने झालेल्या कारवाईचा फार्स असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
“पोलीस, पत्रकार आणि राजकारणी यांनी ठरवले तर, हे सर्व दोन नंबर करणारे सुतासारखे सरळ होतील. पण तसे होत नाही. हीच मोठी शोकांतिका आहे. पोलीस आणि राजकारणी यांचा वरदहस्त असल्यामुळेच हे अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू आहेत. सामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. पोलिसांनी केवळ कारवाईचा फार्स न करता, खऱ्या अर्थाने या अवैध धंद्यांवर कारवाई करावी,” असे मत त्या जेष्ठ नागरिकाने व्यक्त केले.
या घटनेमुळे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याची चौकशी पोलीस प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.