“जनतेची एकता म्हणजे बलाढ्य राष्ट्र निर्मिती” – भ्रष्टाचाराविरोधात शिरूरमध्ये ‘मुंडन आंदोलन’
निर्भय न्यूज लाईव्ह:वृत्तसेवा

शिरूर, ०७ जून २०२५: निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामांविरोधात आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील (सा.बां.वि.) अधिकारी व मंत्र्यांच्या मनमानी कारभाराविरोधात शिरूर येथे “मुंडन आंदोलन” पुकारण्यात आले आहे. “राष्ट्रहितासाठी लोकशक्तीचा जाज्वल्य निर्धार!” या घोषणेखाली उद्या, रविवार, ०८ जून २०२५ रोजी दुपारी १ वाजल्यानंतर तहसीलदार कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे
दोन जूनपासूनच्या सत्याग्रहाची दखल न घेतल्याने ‘मुंडन’चा निर्णय..!!
दिनांक ०२ जून २०२५ पासून सुरू असलेल्या सत्याग्रह आंदोलनाची सार्वजनिक बांधकाम मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अभियंते यांनी गांभीर्याने दखल न घेतल्याने या ‘मग्रुरी’च्या निषेधार्थ हे “मुंडन आंदोलन” आयोजित करण्यात आले आहे. ‘निकृष्ट रस्ते – झोपलेले मंत्री – मग्रूर सचिव – बेजबाबदार अभियंते!’ या शीर्षकाखाली संपूर्ण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा “मुंडन” करून निषेध करण्यात येणार आहे.
“केस नव्हे, भ्रष्ट यंत्रणेच्या बेशरमपणाचे आवरण कापायचं…!”
आंदोलकांनी “राष्ट्रहितासाठी केस नव्हे, आता ह्या भ्रष्ट यंत्रणेच्या बेशरमपणाचे आवरण कापायचं!” असा निर्धार व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक आंदोलनात नागरिक, युवा आणि सामाजिक कार्यकर्ते “सामूहिक मुंडन” करून आपला तीव्र संताप व्यक्त करणार आहेत. या आंदोलनाचे सर्वात धाडसी वैशिष्ट्य म्हणजे, काही महिला भगिनी देखील स्वतःचे केस कापून, आपल्या जिव्हारी लागलेला राग शांततेने पण ठामपणे व्यक्त करणार आहेत.
सरकारला दिलेला आरसा आणि लोकशक्तीचा आवाज.
आंदोलकांच्या मते, हे धाडस म्हणजे सरकारला दिलेला आरसा आहे. गलथान कारभार, भ्रष्ट ठेकेदारी/अधिकारी आणि झोपलेली प्रशासन यंत्रणा यांना धक्का देणारा हाच लोकशक्तीचा आवाज ठरणार आहे. “ज्यांनी केस गमावले, त्यांनी संयम नाही – पण न्याय हरवला तर ‘शिस्तीत क्रांती’ उभी करावीच लागते!” असे मत निलेश मंदा यशवंत वाळुंज यांनी व्यक्त केले आहे, जे या आंदोलनाचे प्रमुख आयोजक आहेत.
या आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व आदरणीय महिला भगिनी, सहकारी कार्यकर्ते/संघटना/सामाजिक कार्यकर्ते, जागृत युवा आणि नागरिकांचे आभार मानण्यात आले असून, त्यांच्यामुळेच हा लढा मजबूत होत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. महिला भगिनींच्या धाडसाला सलाम करून, प्रत्येक जागृत युवा आणि नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.