पुणे ग्रामीण पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी: तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा छडा लागला
निर्भय न्यूज लाईव्ह: वृत्तसेवा

पुणे, ७ जून २०२५: पुणे ग्रामीण पोलिसांनी रांजणगाव एमआयडीसी येथे २५ मे २०२५ रोजी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाचा यशस्वीपणे छडा लावला आहे. नवनियुक्त पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या नेतृत्वाखाली पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
घटनेची माहिती:
२५ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रांजणगाव गणपती गावाजवळ पुणे-नगर हायवेला लागून असलेल्या ग्रोवेल कंपनीजवळ, खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते आणि त्यांची ओळख पटवणे सुरुवातीला कठीण होते. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१) आणि २३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीट अंमलदार, सहायक फौजदार गुलाबराव भीमराव येळे यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवली होती.
पोलिसांची तपास मोहीम:
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे (पुणे विभाग), अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले (शिरूर विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस (दौंड विभाग), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आणि रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह तात्काळ बैठक घेऊन तपासाची दिशा ठरवली.
सुरुवातीला, मृत महिलेच्या हातावरील “जयभिम, Rajratan, mom dad, R S” या टॅटूच्या आधारे ओळख पटवण्यासाठी सात तपास पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी पुणे-नगर हायवेवरील २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, १६,५०० भाडेकरूंची चौकशी केली, तसेच चाकण, तळेगाव, सुपा, रांजणगाव एमआयडीसी येथील कामगारांकडे तपास केला. आरोग्य विभागातील आशा वर्कर्स आणि सेविका यांच्या मदतीने लहान मुलांच्या लसीकरणाची माहिती घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु सुरुवातीला यश आले नाही.
आरोपीची ओळख आणि अटक:
पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी स्वतः पुढाकार घेऊन पुणे ग्रामीण जिल्ह्यातील ३३ पोलीस स्टेशनमधील प्रत्येकी एक अंमलदार आणि स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदार यांची बैठक घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या अखत्यारीत २८ अंमलदारांची ६ तपास पथके तयार करून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात रवाना केली. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधला.
या पथकांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन हरवलेल्या व्यक्तींची माहिती पडताळली. बीड जिल्ह्यात गेलेल्या तपास पथकाला माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये ९ मे २०२५ रोजी दाखल झालेल्या मिसिंग तक्रार क्रमांक १२/२०२५ मधील एका महिलेची नोंद आढळून आली. ही महिला मृत महिलेच्या वर्णनाशी जुळत असल्याने सखोल तपास करण्यात आला.
तपासानंतर मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे (वय २५, रा. वाघोरा, ता. माजलगाव, जि. बीड) असे निष्पन्न झाले. तिचा पती केशव सोनवणे याच्या चौकशीतून असे समोर आले की, स्वाती तिच्या दोन मुलांसह (स्वराज वय २, विराज वय १) आळंदी येथे तिच्या आई-वडिलांकडे गेली होती. तिचा पतीसोबत भांडण झाल्यामुळे, स्वाती आणि तिची दोन्ही मुले तिच्या बहिणीचा दीर गोरख पोपट बोखारे (वय ३६, सध्या रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याच्यासोबत २३ मे २०२५ रोजी रात्री ९ वाजता आळंदीहून निघाले होते. स्वातीचे आई-वडील मोलमजुरी करत असल्याने, त्यांना स्वातीबद्दल माहिती नव्हती.
पुणे ग्रामीण पोलिसांनी गोरख पोपट बोखारे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी गोरख बोखारे हा मृत स्वाती सोनवणेच्या चुलत मामाचा मुलगा असून, त्याच्या भावाला मृत स्वातीची बहीण दिली असल्याने ते नातेवाईक होते. स्वाती आणि तिच्या नवऱ्यामध्ये नेहमी भांडणे होत असत, आणि गोरख बोखारे त्यांच्यातील वाद मिटवत असे. याच दरम्यान, गोरख बोखारे आणि स्वाती सोनवणे यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि स्वाती गोरखला लग्नासाठी मागणी करत होती.
गुन्ह्याचे स्वरूप:
२३ मे २०२५ रोजी रात्री, आरोपी गोरख पोपट बोखारे त्याच्या मोटरसायकलवर मृत स्वाती सोनवणे आणि तिची दोन्ही मुले यांना आळंदीहून सरदवाडी, शिरूर येथे घेऊन जात असताना, रांजणगाव गणपती गावाजवळ पुणे-नगर हायवेला लागून असलेल्या ग्रोवेल कंपनीजवळील कच्च्या रस्त्यावर त्याने मोटरसायकल थांबवली. लग्नाच्या मागणीला विरोध करण्यासाठी त्याने स्वाती आणि तिच्या दोन्ही मुलांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकले.
पुढील कार्यवाही:
आरोपी गोरख पोपट बोखारे याला रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याला ११ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळाली आहे.
या कार्यवाही मध्ये सहभागी अधिकारी व कर्मचारी
पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, एएचटीयू पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, रांजणगाव पोलीस स्टेशनचे निळकंठ तिडके, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, अक्षय नवले, संदीप वारे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, राजू मोमीन, अतुल डेरे, सागर धुमाळ, मंगेश थिगळे, बाळासाहेब खडके, रामदास बाबर, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, निलेश शिंदे, अतुल फरांदे, महेश बनकर, विनोद भोकरे, काशिनाथ राजापुरे, रांजणगाव पोलीस स्टेशनचे गुलाब येळे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, विजय सरजिने, उमेश कुतवळ, वैभव मोरे, योगेश गुंड, किशोर शिवणकर, केशव कोरडे, ज्ञानेश्वर शिंदे, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे जयराज देवकर, अमोल नलगे, शिरूर पोलीस स्टेशनचे विजय शिंदे, निखिल रावडे, नितेश थोरात आणि बीड जिल्ह्यात गेलेल्या विशेष तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय यादव, दरशथ बनसोडे, महादेव साळुंखे, गणेश वानकर, सुमित वाघ यांनी ही कामगिरी केली आहे.